Welcome::Vaduj Runner's Foundation

About MM

माणदेश मॅरेथाॅन...
माणदेश...ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजाच्या पदस्पर्शाने पुनित झालेला व पूर्वेकडून म्हसवडचा सिद्धनाथ , पश्मिमेकडून पुसेगांव स्थित सेवागिरी उत्तरेकडून शिखर शिंगणापूरचा शंभूमहादेव आणि दक्षिणेकडून रेवणसिद्ध ... असा चोहोबाजूने आशिर्वाद असलेला माणदेश... दगडधोंड्याचा खडकाळ माणदेश, दगडथोड्यांशी आणि पाचवीला पुजलेल्या दुष्काळाशी झुंज घेऊन सदैव लढत असलेल्या कष्टकर्‍यांचा माणदेश. अनेक आएएस् व तत्सम अधिकार्‍यांची मांदियाळी असलेल्यांचा आणि बुद्धीची खाण असलेला माणदेश... सलग बारा वर्षाच्या दुष्काळ असूनदेखील एकाही शेतकरी आत्महत्येची नोंद नसणारा जिगरबाज शेतकर्‍याचा हा माणदेश...
दुष्काळाची झुंजता झुंजता बळकट झालेल्या इथल्या मनोवृत्तीने अनेक शिखरे लीलया काबिज केली आहेत. आज इथल्या झुंजार माणदेशी हिंमतीने पाण्यासाठी कंबर कसली आहे. पाणी फौंडेशन च्या महाश्रमदान प्रसंगीच्या लोकसहभागाने संपूर्ण जगाला चकित करुन सोडले होते. मागील तीन वर्षात तब्बल पाच गावांनी या स्पर्धेत महाराष्ट्रात बाजी मारलेली आपण पाहिले आहे. याबरोबरच अतिशय तुटपुंज्या सुविधांवर आज माणदेश माण उंचावतय ते क्षेत्र म्हणजे क्रीडा क्षेत्र...
काही वर्षापूर्वी मोही मार्डी रस्त्यावर अनवाणी पळणार्‍या ललिताच्या चिमुकल्या पावलांनी भविष्यात इतिहास घडवला आणि अखंड माणदेशाचा आंतरराष्ट्रीय गौरव झाला. सलग तीन वेळा विक्रमी वेळेत मुंबई मॅरेथाॅन जिंकणार्‍या ललिताने आशियाई क्रीडास्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आणि आॅलंपिकमधे ललिताच्या रुपाने भारतीय महिलेला प्रतिनिधित्व मिळाले. या संधीचे सोने करीत ललिताने या आॅलंपिकमधे अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. तब्बल बत्तीस वर्षानंतर हे यश तिने भारताला मिळवून दिले होते.
माणूस रांगायला लागला... रांगता रांगता चालायला लागला... चालता चालता धावायला लागला... आणि मग त्याला धावायला वाहन नावाचं साधन मिळताच हे सगळंच थांबलं आणि डायबेटीस, ब्लडप्रेशर, स्ट्रोक अशी नाना साधने माणसाच्या धमन्यातून धावू लागली. आणि अनेकांचे प्रवास वेळी अवेळी थांबू लागले. धावण्याचे हे महत्व वेळीच जाणले माणसाने आणि आता स्वत:च्या आरोग्यासाठी परत स्वत:च स्वत:शी धावण्याची शर्यत लावू लागला. स्वत:च्या परीने माणूस धावू लागला, पळू लागला. इथे, तिथे, वेगवेगळ्या ठिकाणी माणसे धावू लागली. हे सर्व धावणे जर एकत्र आणले तर एक माणदेशी जल्लोष तयार होईल, इथल्या रोमारोमात चैतन्य उसळेल. समस्त माणदेश जेव्हा माणदेशातील रस्त्यावरुन धावेल तेव्हा निसर्गही तरारुन उठेल.
तर चला आपण ही साक्षीदार होऊया या अविस्मरणिय आणि ऐतिहासिक घटनेचा. जिथे असाल तिथे आपल्या ह्रदयाला साद द्या आणि आपल्यासाठी, आपल्या निरोगी ह्रदयासाठी, आणि आपल्या लाडक्या माणदेशासाठी सगळे एक दिवस एकत्र येऊया. प्रचंड संख्येने सहभागी होऊन माणदेश काय करु शकतो हे जगाला दाखवून देऊया... यशस्वी करुया एक अभियान... माणदेश मॅरेथाॅन... मॅरेथाॅन ही केवळ शहरी संस्कृतीचा भाग आहे ही ओळख पुसून टाकणारे ग्रामिण भागातील पहिले भव्य दिव्य मॅरेथाॅन... माणदेशाची संपूर्ण ओळख जगाला करुन देणारे असे हे मॅरेथाॅन... एक पहिले ऐतिहासिक मॅरेथाॅन जे माणदेशातील दोन शहरे जोडणारे असेल...
शहरी झुंबा डान्स करुन वार्मअप करण्याऐवजी पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात गजीनृत्याने सुरुवात होणारे मॅरेथाॅन... शहरी मॅरेथाॅनच्या ठरलेल्या फाॅरमॅटच्या टी शर्ट ऐवजी माणदेशाचा पारंपारिक अभिमान असणारा बंडी व घोंगडे स्टाईल पोषाख असणारे मॅरेथाॅन... पाश्चात्य संगीत व बॅंजोऐवजी गजी लेझीम आणि डफली यांचे पारंपारिक संगीत असणारे मॅरेथाॅन... ठिकठिकाणी वाटेत आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी डफ व ढोलकी पथके असणारे मॅरेथाॅन... फास्टफूडऐवजी अस्सल गावरान पिठलं भाकरी आणि हिरव्यागार मिरचीचा ठेचा दही तसेच स्वीट म्हणून लापशी असा आगळावेगळी रिफ्रेशमेंट थाट असणारे मॅरेथाॅन... आणि... बक्षीस म्हणून ट्राॅफी सोबतच माणदेशी घोंगडे, काठी आणि फेटा असा अस्सल माणदेशी बहुमानाने विजेत्याला गौरवणारे आगळेवेगळे मॅरेथाॅन... आणि हे सर्व अतिशय माफक अशा रजिस्ट्रेशन मूल्यामधे... अशा अनेक वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी सजलेले एका आगळेवेगळ्या माणदेश मॅरेथाॅन आयोजित करत आहे.
वडूज रनर फौंडेशन...
माणदेशाच्या नैऋत्येस असणार्‍या आणि 1942 च्या स्वातंत्र्यसंग्रामात जीवाची बाजी लावणार्‍या वीरांच्या खटाव तालुक्यातील वडूज मधून याची सुरुवात झाली असं म्हणता येईल. काही वर्षापूर्वी वडूज शहरातील दोन तीन तरुण डाॅक्टर्सनी सकाळी धावायला सुरुवात केली, आणि या वडूज रनर फौंडेशनची बीजे रोवली गेली.
यापासून प्रेरणा घेऊन धावणार्‍यांची संख्या वाढत गेली आणि वडूजच्या तरुणाईला धावण्याचं जणू वेडंच लागलं. पहाता पहाता या चळवळीचं आज वटवृक्षात रुपांतर झाले आणि आज वडूज रनर फौंडेशन हे आगळंवेगळं माणदेश मॅरेथाॅन* आयोजित करत आहे.
अनेक अस्सल माणदेशी गौरवशाली परंपरेचा बहुमान करणारे हे माणदेशी मॅरेथाॅन आज आपल्यातील माणदेशी अस्मितेला साद घालत आहे. आपण सर्वांनी प्रचंड संख्येनी या मॅरेथाॅनमधे भाग घेऊन या ऐतिहासिक घटनेचे भागिदार होऊया...

Vaduj Runner's Foundation

Welcome::Vaduj Runner's Foundation