Welcome::Vaduj Runner's Foundation

Gondwalekar Maharaj

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धांत जे विख्यात महाराष्ट्रीय संत होऊन गेले त्यांच्यापैकीं श्रीब्रह्मचैतन्य तथा गोंदवलेकर महाराज हे एक होत. त्यांचा जन्म माघ शुद्ध द्वादशी शके १७६६ (इ.स. १८४५) या दिवशी गोंदवले बुद्रुक या गावी झाला. हे गांव सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असून ते सातारा-पंढरपूर रस्त्यावर सातार्‍यापासून चाळीस मैलांवर आहे. त्यांच्या घराण्यांत विठ्ठलभक्ती व पंढरीची वारी असून पूर्वज सदाचारसंपन्न व लौकिकवान होते. ते घरी थोडी शेती करून कुलकर्णीपणाचें काम करीत. श्रीमहाराजांचे मूळ नांव गणेश रावजी घुगरदरे. स्मरणशक्ती, चलाख बुद्धि, पुढारीपणा, निर्भय वृत्ती, एकांतप्रियता, रामनामाची आवड ह्या गोष्टी श्रीमहाराजांमध्यें लहानपणापासूनच होत्या. ते नऊ वर्षांचे असतांना गुरूच्या शोधार्थ घर सोडून गेले. पण त्यांच्या वडिलांनी ते कोल्हापुरास आहेत असे कळल्यावर त्यांनी त्यांना घरी परत आणले. त्यांचे वयाच्या अकराव्या वर्षीं लग्न करण्यांत आले, परंतु त्यांचे प्रपंचात चित्त रमेना, आणि ते लवकरच गुरुशोधार्थ पुन्हा घर सोडून निघून गेले. त्यांनी तत्कालीन प्रसिद्ध व अप्रसिद्ध अशा सत्पुरुषांच्या भेटी भेतल्या. पण त्यांच्या मनाचे समाधान झाले नाही. ते विशेषतः उत्तर भारतात गुरुशोधार्थ हिंडले. शेवटी रामदास स्वामींच्या परंपरेतील एक थोर सत्पुरुष श्रीरामकृष्ण हे गोंदवलेकरांना भेटले आणि त्यांना नांदेड जवळील येहळेगांव या गावी श्रीतुकारामचैतन्य यांचेकडे जाण्याचा सल्ला दिला.

Shikhar Shignapur

सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये दहिवडी गावापासून २० कि.मी. अंतरावर शिखर शिंगणापूर वसले आहे. ते फलटणच्या आग्नेयेस ३७ किमी.एवढ्या अंतरावर आहे. इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे हे मंदिर याच डोंगरावर समुद्र सपाटीपासून १,०५० मी. उंचीवर आहे.
मंदिरात जायला जवळपास ४०० पायऱ्या चढून जावे लागते. त्यापुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे. या मंदिराचे शिखर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. शिखरावर अगदी नाजुक नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या आवारात अनेक दीपमाळा आहेत. या मंदिराच्या पश्चिमेकडे एक अमृतेश्वराचे हेमाडपंती मंदिर आहे. शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव हा महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव दोनीही यादव कुळातील सिंधण राजाने वसवली आहेत, असे म्हणतात. मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठे नंदी आहेत. देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण राजा येथे येऊन राहिला होता. त्यानेच शिंगणापूर गाव वसविले.

Mayani Abhayarranya

मायणी पक्षी अभयारण्य : मायणी पक्षी अभयारण्य हे सातारा जिल्ह्यातील वडुज गावानजीक स्थित आहे. मायणी हे भारता मधील प्रमुख पक्षी अभयारन्यांपैकी एक आहे. मायणी हे सातारा शहरापासून 65 किमी अंतरावर आहे. खूप सारे प्रवासी पक्षी जसे कि फ्लेमिंगो (राजहंस) या क्षेत्रामधून जातात. 2005 च्या आकडेवारीनुसार येथे जवळपास 400 स्थलांतरित पक्ष्यांच्या उपस्थितीची सूचना मिळाली.
मायणी मधील अनुकूल निसर्ग आणि हवामान याच कारणामुळे येथे दर वर्षी स्थलांतरित पक्षी येतात. या अभयारण्यामध्ये ब्राह्मिनी बदक, कूट, कॉमन स्पून बिल्स, पेंटेड स्टॉर्क, ब्लैक आइबिस इत्यादी स्थलांतरित पक्षी आणि उत्तरी Shoveler, सारस आणि किंगफिशर असे इतर पक्षी पाहायला मिळतील. फ्लेमिंगो हे पक्षी येथील नियमित हिवाळी पाहुणे असतात. फ्लेमिंगो पक्षी हे उथळ पाण्यामध्ये स्वतःचे अन्न शोधत असतात. या पक्षांचे मुख्य अन्न म्हणजे कीटक, किडे, छोटे मासे आणि खेकडे होय. फ्लेमिंगोंना त्याच्या मोठ्या समूहात पाहणेच नयनरम्य असते. मायणी पक्षी अभयारण्याद्वारा आर्द्रभूमि पारिस्थितिकी तंत्राचा अभ्यास आणि संशोधन केले आहे. येथे असलेल्या विस्तृत जलाशयाशेजारी प्राकृतिक वनाचे Conservaion यासाठी प्रयत्न केले आहेत.

Sevagiri temple Pusegoan

सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथे दरवर्षी मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला, सेवागिरी महाराजांचा रथोत्सव साजरा केला जातो. सेवागिरी महाराजांनी त्यांचे कार्य संपल्यानंतर (10 जानेवारी 1948 या दिवशी, मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला) पुसेगाव येथे समाधी घेतली. त्यानंतर पुसेगावात रथोत्सव साजरा केला जाऊ लागला.
पुसेगावचे मूळ नाव पुसेवाडी असे होते. सातारा-पंढरपूर मार्गावर वेदावती नदीच्या तीरावर वसलेले, जेमतेम पन्नास-शंभर उंबर्‍यांचे खेडेगाव. पुसेवाडी हा रामायणकालीन दण्‍डकारण्याचा भाग समजला जातो. अंदाजे पाचशे वर्षांपूर्वी एका धनगर कुटुंबामुळे पुसेवाडी ही वसाहत झाली. पुसेवाडीची दुसरी नोंद नेर-पुसेवाडी अशी आहे. धनगर कुटुंबाच्या जोडीला असणारी शहाण्णव कुळी मराठा जाधव मंडळी ही बारामती तालुक्यातील परिंचे या गावाहून येथे आली असे समजतात.
पुसेवाडीच्या पूर्वेला अडीच किलोमीटर अंतरावर समाजक्रांतीचे जनक महात्मा जोतीराव फुले यांचे कटगुण हे जन्मस्थान, पश्चिमेला शिवकालीन प्रसिद्ध वर्धनगड किल्ला, दक्षिणेला रामेश्वराचा डोंगर -त्याच्या पायथ्याला वसलेले विसापूर हे गाव आणि उत्तरेस तीन किलोमीटर अंतरावर 1870 साली ब्रिटिशांनी बांधलेला नेर तलाव, पाच किलोमीटर अंतरावर घाटावरील आंब्‍यांसाठी प्रसिद्ध असलेले बुध (पाचेगाव), अशी पुसेवाडीला भौगोलिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक परिसराची चतु:सीमा आहे. जवळून वाहणार्‍या वेदावती नदीच्या काठावर नाथपंथीयांच्या अकरा लिंगांपैकी पहिले लिंग आहे. ते सिद्धेश्वराचे देवस्थान आहे.

Welcome::Vaduj Runner's Foundation